
“भारत कुणाचा आदेश घेत नाही.”, रशियन तेल खरेदीच्या मुद्द्यावर वाद वाढला; कमल हासन यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना खुले पत्र!
India Russia oil news : रशियाकडून तेल खरेदी करण्यासंदर्भात भारताला तात्पुरती सूट देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर अभिनेते-राजकारणी कमल हासन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. भारत हा स्वतंत्र आणि सार्वभौम देश असून तो परदेशी सरकारांकडून आदेश घेत नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.
सोशल मीडिया ‘एक्स’वर प्रसिद्ध केलेल्या एका खुल्या पत्रात ‘मक्कल नीधी मय्यम’ या पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना धोरणात्मक निर्णयांमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याचे आवाहन केले. मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल बाजारपेठेत व्यत्यय निर्माण झाला असताना अमेरिकेने भारतीय तेल शुद्धीकरण केंद्रांना रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवण्यासाठी तीस दिवसांची तात्पुरती सूट दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘आम्ही आदेश घेत नाही…’
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात कमल हासन यांनी भारताच्या सार्वभौमत्वावर भर देत कडक शब्दांत संदेश दिला. त्यांनी लिहिले की, “आम्ही भारताचे नागरिक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राचे आहोत. आम्ही दूरच्या परकीय किनाऱ्यांकडून आदेश घेत नाही. कृपया आपल्या क्षमतेनुसार आपले कार्य करा. सार्वभौम राष्ट्रांमधील परस्पर आदर हाच कायमस्वरूपी जागतिक शांततेचा पाया आहे. आम्ही तुमच्या देशाला आणि नागरिकांना शांतता व समृद्धीच्या शुभेच्छा देतो.”
अमेरिका काय म्हणाली होती?
दरम्यान, भारताला रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाबाबत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी स्पष्टीकरण दिले. जागतिक ऊर्जा बाजारपेठ अस्थिर असताना हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक माध्यमावरील संदेशात त्यांनी म्हटले की, “भारतातील आमचे सहकारी जबाबदार भागीदार आहेत आणि त्यांनी यापूर्वी निर्बंधित रशियन तेलाची खरेदी थांबवली होती. जगभरातील तेल पुरवठ्यातील तात्पुरती तफावत कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना आधीच धोक्यात असलेले रशियन तेल स्वीकारण्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे तेल पुरवठ्याचे मार्ग विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून जागतिक तेल बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे तेलाच्या किमती झपाट्याने वाढू शकतात, अशीही चिंता व्यक्त केली जात आहे.
अनेक पर्यायी मार्ग उपलब्ध
दरम्यान, सरकारने भारताचा तेल पुरवठा सुरक्षित आणि स्थिर असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘पीआयबी’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारताने कच्च्या तेलाचे स्रोत अनेक देशांमध्ये विविध केले आहेत. सध्या भारत सत्तावीस ते चाळीस देशांकडून कच्चे तेल आयात करतो, त्यामुळे अनेक पर्यायी पुरवठा मार्ग उपलब्ध झाले आहेत.
सरकारने हेही स्पष्ट केले की भारत तेल खरेदी करताना राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देतो. “राष्ट्रीय हित लक्षात घेऊन भारत जिथे सर्वात स्पर्धात्मक आणि परवडणाऱ्या किमती मिळतात, तिथूनच तेल खरेदी करतो,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.




