
भविष्यात याचा निश्चितच त्रास होणार’, इराण युद्धावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ चुकीवर ठेवलं बोट!
Raj Thackeray Gudhi Padwa Melava Iran Israel War : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर संपन्न झाला. राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच इराण-इस्रायल युद्धावर भाष्य करत देशावर ओढवलेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईवर बोट ठेवले.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजलीसाठी उशीर केला, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे म्हणाले, “देशात आज धाकधूक असून भीषण परिस्थिती आहे. नेहमी नॉर्मलवर असणारे लोक सध्या गॅसवर आहेत. काही गोष्टी आपल्या पंतप्रधानांकडून राहून गेल्या. इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता. त्या इराणवर ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत, ते पाहता आपण इराणला साथ द्यायला हवी होती.”
भविष्यात याचा त्रास होणार
“इराण आपल्याला रुपयामध्ये तेल देतो किंवा देत आला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी निषेधाबद्दल प्रतिक्रिया दिली नाही. हल्ल्याबद्दलही ते काही बोलले नाहीत. जो देश आजवर जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर भारताला पाठिंबा देत आला. त्याच्यामागे आपण अडचणीच्या काळात उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चितच आपल्याला भविष्यात होणार”, असेही भाष्य राज ठाकरे यांनी केले.
२८ फेब्रुवारी रोजी खामेनींचा मृत्यू
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ले करण्यास सुरूवात केली. त्याचदिवशी ८६ वर्षीय अयातुल्ला खामेनींचा क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्यासह इराणचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि खामेनींच्या कुटुंबियांचाही मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूबद्दल भारताच्या वतीने श्रद्धांजली व्यक्त केली.
इन्स्टाग्रामधून बाहेर या
आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भाष्य केल्यानंतर राज ठाकरे यांनी देश आणि राज्यातील प्रश्नांवर भाष्य केले. देश आणि राज्यातील भीषण परिस्थिती कार्यकर्त्यांसमोर मांडत असताना ठाकरे यांनी मोबाइल आणि इन्स्टाग्राममधून बाहेर येण्याचे आवाहन केले.
“आज संपूर्ण देशाला करमणुकीत गुंतवून ठेवलं आहे. आयपीएल सुरु आहे. कुठले कुठले पिक्चर येत आहेत. मी आज तुम्हाला नम्र विनंती करणार आहे, पहिल्यांदा मोबाइलच्या इन्स्टाग्राममधून बाहेर या. मध्यंतरी रिलबाज वगैरे आले होते. गुंतायला होतं त्यात. डान्सबार झाले त्याची लक्षणं आहेत तिथे नोटा उधळणं बंद झालं इथे हे सुरु झालं. तु्म्हाला गुंतवून ठेवायचं आणि सरकारला प्रश्न विचारु नयेत यासाठीचं हे डिझाईन आहे. हे फक्त भारतात नाही जगभरात सुरू आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.




