भक्ष्याचा पाठलाग करताना काळा बिबट्या पडला विहिरीत

कोळंबे (रत्नागिरी) येथील घटना : वन विभागाचे प्रयत्न सुरू

रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे खांबाचा मळा परिसरात दुर्मिळ ‘ब्लॅक पँथर’ (काळा बिबट्या) विहिरीत पडल्याची घटना आज (२१ मार्च) सकाळी घडली. वासराचा पाठलाग करण्याच्या नादात हा बिबट्या विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून, त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

कोळंबे येथील खांबाचा मळा भागात राहणाऱ्या भागवत यांच्या विहिरीजवळ आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास काही हालचाल जाणवली. कुतूहलापोटी विहिरीत डोकावून पाहिले असता, त्या ठिकाणी एक काळा बिबट्या पाण्यात पडलेला दिसून आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास एका वासराचा पाठलाग करत असताना हा ब्लॅक पँथर थेट विहिरीत कोसळला.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम पिंजरा आणि आवश्यक रेस्क्यू साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. गेल्या अडीच तासांपासून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विहिरीत पाणी असल्याने बिबट्याला सुरक्षित बाहेर काढणे हे वन विभागासमोर मोठे आव्हान आहे.

बिबट्याला कोणतीही इजा होऊ नये, यासाठी वन विभागाचे कर्मचारी अत्यंत सावधगिरीने काम करत आहेत. विहिरीत शिडी किंवा पिंजरा सोडून त्याला त्यात जेरबंद करण्याचे नियोजन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button