बेर्डेवाडी कालव्यासाठी ४ कोटींचा निधी मंजूर

आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश


लांजा : तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील बेर्डेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या प्रलंबित प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. आमदार किरण (भैया) सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कालव्याच्या बंदिस्त नलिका प्रणालीसाठी शासनाकडून ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे गेल्या चार वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी मार्गी लागली असून बेर्डेवाडी कालव्याला एक प्रकारे ‘नवसंजीवनी’ मिळाली आहे.

​बेर्डेवाडी प्रकल्पांतर्गत १०८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. २०१६ मध्ये ६ किमी लांबीच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले होते, मात्र तो कालवा अस्तरीकरण विरहीत असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात झिरपत होते. यामुळे केवळ २ किमीपर्यंतच पाणी पोहोचत होते आणि झिरपणाऱ्या पाण्यामुळे शेतीचेही नुकसान होत होते. २०२५ मध्ये दुरुस्ती करून ५ किमीपर्यंत पाणी पोहोचवण्यात आले, तरीही शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी ‘बंदिस्त नलिका’ असणे अनिवार्य होते.

​वेरवली बुद्रुक येथील ग्रामस्थांनी ही समस्या आमदार किरण सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यावर तातडीने कार्यवाही करत आमदारांनी कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्याकडे या कामासाठी पत्रव्यवहार केला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता या कामासाठी निधी मंजूर झाला आहे.
६ किमी लांबीच्या डाव्या कालव्याच्या कामासाठी ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निर्णयामुळे सुमारे ५२२ हेक्टर क्षेत्र थेट सिंचनाखाली येणार आहे. केवळ डावाच नव्हे, तर उजव्या कालव्याबाबतही महत्त्वाची प्रगती झाली आहे. केंद्रीय जल ऊर्जा संशोधन केंद्र, पुणे यांचा अहवाल प्राप्त झाला असून, विमोचकाची दुरुस्ती करून उजवा कालवाही बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे कार्यान्वित केला जाणार आहे.

“गेल्या ४ वर्षांपासून आमची बंदिस्त नलिकेची मागणी प्रलंबित होती. आमदार किरण भैया सामंत यांनी स्वतः लक्ष घालून निधी मंजूर करून आणल्यामुळे आता आमच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणार आहे,” अशा भावना वेरवलीच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button