
बांबू पिकाला आता स्वतंत्र दर्जा देण्याचा शासनाचा विचार
निसर्गाच्या कचाट्यात सापडेले आंबा-काजू पिक त्यातच भातशेतीचे घटते उत्पन्न यातून कोकणातील शेती आणि उद्योगांना बळ देण्यासाठी बांबू या पिकाला आता स्वतंत्र पिकाचा दर्जा देण्याचे धोरण सरकार तयार करत असल्याची घोषणा राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांनी केली आहे. या निर्णयामुळे कोकणातील शेतकर्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, याकडे कोकणच्या विकासाचा एक नवा अध्याय म्हणून पाहिले जात आहे.
कोकणची भौगोलिक परिस्थिती आणि येथील हवामान बांबू लागवडीसाठी अत्यंत पोषक आहे. मात्र, आतापर्यंत बांबूकडे केवळ एक जंगलातील उत्पादन किंवा कुंपणासाठी वापरले जाणारे झाड म्हणून पाहिले जात होते. बांबूला अधिकृतपणे पीक म्हणून मान्यता मिळाल्यास, शेतकर्यांना इतर पिकांप्रमाणेच शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. यामध्ये प्रामुख्याने पीक विमा, सवलतीच्या दरात कर्ज, दर्जेदार बियाणे आणि खतांचा पुरवठा यांचा समावेश असेल. राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केल्यानुसार, या धोरणामुळे बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढवण्यास मदत होईल आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल.www.konkantoday.com




