
बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
मंडणगड येथील आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर म्हाप्रळ बौद्धवाडी येथे खासगी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत साहिल विजय बेद्रे (२३) या तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी ८ च्या सुमारास हा अपघात घडला. मृत साहिल बेंद्रे मूळचा लांजा तालुक्यातील कोचरी येथील असून सध्या तो घाटकोपर (मुंबई) येथे वास्तव्यास होता. शिमगोत्सवासाठी तो मित्रांसमवेत दुचाकीवरून दापोली तालुक्यातील पांगारी गावाकडे जात होता. मात्र वाटेतच काळाने त्याच्यावर झडप घातली.
म्हाप्रळ बौद्धवाडी येथे महामार्ग कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. सकाळी साहिल दुचाकीने पुढे जात असताना मुंबईच्या दिशेने जाणार्या प्रवासी बसने दुचाकीला समोरून धडक दिली. यात साहिल गाडीच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू
झाला तर सोबतचा सहप्रवासी दूर फेकला जाऊन जखमी झाला. जखमीला उपचारासाठी भिंगळोली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर मंडणगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून संबंधित चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, दुभाजक व योग्य सूचना फलकांचा अभाव तसेच खड्डे यामुळे हा मार्ग अपघाताचा सापळा ठरत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.www.konkantoday.com




