
प्रमुख गाड्यांच्या कोट्यात ५० टक्के वाढ
उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात कोकण रेल्वे प्रवासात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, मे महिन्यापासून रत्नागिरी स्थानकासाठी कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी आणि वंदे भारत एक्सप्रेस यांसारख्या प्रमुख गाड्यांचा प्रवासी कोटा ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे यामुळे कोकणात जाणार्या प्रवाशांची मोठी सोय उपलब्ध होणार आहे.
कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची २३ वी बैठक नुकतीच नवी मुंबई येथे संपन्न झाली. कोकण रेल्वेचे सीएमडी संतोषकुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर, आमदार संजय केळकर, खासदार अनुप धोत्रे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन बहाळकर यांनी रत्नागिरी स्थानकासाठी कोटा वाढवण्याचा मुद्दा लावून धरला होता. त्यानुसार ५ मार्च रोजी पीआरएस टर्मिनलवर आवश्यक सुधारणा करण्यात आली आहे या निर्णयाचा थेट फायदा केवळ रत्नागिरीच नाही, तर संगमेश्वर, चिपळूण आणि खेड येचील प्रवाशांनाही होणार आहे. हा वाढीव कोटा मडगाव येथून रत्नागिरीकडे वर्ग करण्यात आला आहे, ज्यामुळे रत्नागिरीतील प्रवाशांना तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता वाढली आहे.
www.konkantoday.com




