
पुढच्या ४८ तासांत ‘होर्मुझ’ खुला करा नाहीतर पॉवर प्लांट उडवू”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा!
Trump threatens Iran : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर इराणने आखाती देशांची कोंडी केली. तसंच जगभरात ऊर्जा पुरवणाऱ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जलमार्ग म्हणजेच होर्मुझच्या सामुद्रधुनीवरही कब्जा मिळवून त्याचा मार्ग अडवून ठेवला आहे.
परिणामी जगभरातून संताप व्यक्त केला जातोय. कारण यामुळे इंधनांची कपात होऊन दर गगनाला भिडले आहेत. दरम्यान, यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आता थेट इशारा दिला आहे. येत्या ४८ तासांत ही सामुद्रधुनी जलप्रवासासाठी खुली करण्याची धमकी दिली आहे.
एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर हा जलमार्ग पुढच्या ४८ तासांत कोणत्याही धोक्याशिवाय पूर्णपणे खुला झाला नाही, तर अमेरिका इराणच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून सुरुवात करून विविध ऊर्जा प्रकल्पांना उद्ध्वस्त करेल.
इराणच्या नाकेबंदीचा जगभरातून निषेध; २२ देशांची कडक भूमिका
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये केलेल्या अंशतः नाकेबंदीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा आणि सागरी सुरक्षेवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक देशांनी आता इराणच्या या कृतीचा निषेध केला आहे. शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) देखील या निषेध मोहिमेत सामील झाले असून, इराणवर टीका करणाऱ्या देशांची एकूण संख्या आता २२ वर पोहोचली आहे. यामध्ये ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि जपान यांसारख्या प्रमुख देशांचा समावेश आहे.
एका संयुक्त निवेदनात या देशांनी म्हटले आहे : “खाडीतील निशस्त्र व्यापारी जहाजांवर इराणने केलेले अलीकडील हल्ले, तेल आणि वायू प्रकल्पांसह नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ले आणि इराणी सैन्याने होर्मुझची सामुद्रधुनी प्रत्यक्षात बंद पाडल्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.”
या देशांनी सागरी मार्ग मोकळा ठेवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शविला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, “सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी योग्य प्रयत्नांमध्ये योगदान देण्यास आम्ही तयार आहोत. जे देश यासाठी पूर्वतयारी आणि नियोजनात गुंतले आहेत, त्यांच्या वचनबद्धतेचे आम्ही स्वागत करतो.” मात्र, यामध्ये कोणत्याही विशिष्ट लष्करी उपाययोजनांचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
इराणकडून लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र हल्ले
अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणविरोधात युद्ध चालू केल्यास आता चार आठवडे होत आहेत. गेल्या चार आठवड्यात सर्वाधिक फटका आखाती देशांना बसला आहे. तसंच, आखातातून इतर देशांत ऊर्जा, इंधन आणि अन्य निर्यात होणाऱ्या पदार्थांच्या तुटवड्यामुळे त्या संबंधित देशांत तूट निर्माण झाली आहे. परिणामी या युद्धाचे चटके संपूर्ण जगभर बसायला सुरुवात झाली आहे. इराणने काल पहिल्यांदा लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र इस्रायलवर डागले. या हल्ल्यात अणू केंद्राजवळील डझनभर लोक जखमी झाले आहेत.
एयाल झमीर यांनी सांगितले की, इराणने दिएगो गार्सिया येथील अमेरिका-ब्रिटन लष्करी तळावर ४,००० किमी पल्ल्याची दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यापासून इराणने प्रथमच अशा लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे.
नेतांज कॉम्प्लेक्सवर हल्ला
इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायली सैन्याने शनिवारी सकाळी शाहिद अहमदी-रोशन नेटान्झ संवर्धन संकुलावर हल्ला केला. या युद्धात आतापर्यंत इराणमध्ये २,००० हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर इराणच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे.




