
पाली दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे १५ रोजी उद्घाटन
रत्नागिरी / :
कोकणातील ऐतिहासिक पाली दीक्षाभूमी येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन रविवार दि. १५ रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार असून लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत तसेच सुप्रसिद्ध उद्योजक रविंद्र उर्फ अण्णा सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर कोकणातील पहिल्या धम्मदीक्षेचा ऐतिहासिक सोहळा सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १ मे १९५७ रोजी पाली येथे पार पडला होता. त्यामुळे पाली दीक्षाभूमीला बौद्ध समाजात विशेष ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याच पवित्र स्थळी उभारण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता नाणीज येथून बुद्धमूर्ती आगमनाने होणार असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पाली येथून पाली बौद्धवाडी समाजमंदिर मार्गे बाजारपेठेतून दीक्षा भूमीपर्यंत भव्य धम्म रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता धम्मध्वजारोहण होईल. त्यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना, पूजापाठ व धम्मदेशना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत
भन्ते डॉ.मैत्रेयघोष आयुपाल यांच्या उपस्थितीत स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर मा. ना. उदय सामंत यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन पार पडेल. सायंकाळी ३.३० ते ५ वाजेपर्यंत समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.
हा कार्यक्रम पाली पंचक्रोशी बौद्ध समाज मंडळ, महिला मंडळ पाली पंचक्रोशी व तरुण मंडळ पाली पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.




