
पालीत घरफोडी; रोख रक्कम लंपास
पाली : मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती पाली बाजारपेठेनजीक असणार्या माईनवाडीतील एका घरात कोणी नसताना मागील दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत लोखंडी कपाटात ठेवलेले रोख रक्कम ५३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या धाडसी चोरीच्या घटनेमुळे पालीसह विभागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
यासंदर्भात पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, पाली बाजारपेठेनजीकच्या माईनवाडीमधील दुर्गेश रामदास पाटील यांच्या घरात २ मार्च ते ८ मार्च या दरम्यान कोणीही नसताना अज्ञात चोरट्याने घराचा मागील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली आहे. यामधे २,१५० रुपये रकमेची नाणी व ५१,६०० या रकमेच्या चलनी नोटा असे एकूण ५३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला आहे. दुर्गेश पाटील हे आपल्या आईला सोबत घेऊन तिच्या वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथे गेलेले असतानाच अज्ञात चोरट्याने अचूक वेळ साधत ही धाडसी चोरी केलेली आहे. चोरीची घटना घडलेले ठिकाण हे मुंबई गोवा महामार्गावर असूनही चोरी झालेली असल्याने खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव,पाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल सूर्याजी पाटील याचबरोबर फॉरेन्सिक विभागाची टीम, श्वान पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तपासाच्या दृष्टीने आवश्यक ते पुरावे गोळा केले आहेत.
या चोरीची फिर्याद दुर्गेश रामदास पाटील यांनी दिली असून गुन्ह्याची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे हे करीत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील पाली बाजारपेठच्या लगत असणार्या माईनवाडी या नागरी वस्तीत झालेल्या या धाडसी चोरीने संपूर्ण पाली गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.




