पश्चिम आशियात युद्धाग्नी! इस्रायल,अमेरिकेचे इराणवर हल्ले; इराणकडून प्रत्युत्तर, युद्धाच्या झळा इतर आखाती देशांनाही!

विमान उड्डाणे स्थगित; तेल, मालवाहतुकीवर परिणाम!

दुबई : अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणविरोधात संयुक्त मोहीम हाती घेऊन त्या देशावर जोरदार हल्ले केले. इराणच्या धार्मिक, राजकीय आणि लष्करी नेतृत्वाला या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेने या मोहिमेला ‘एपिक फ्युरी’ तर इस्रायलने ‘लायन्स रोअर’ नाव दिले आहे. मात्र इराणनेही इस्रायलसह कतार, कुवेत, बहारिन, संयुक्त अरब अमिराती येथील अमेरिकी लष्करी तळांवर प्रतिहल्ले करून संघर्षाची व्याप्ती वाढवली.

इराणचा पाठिंबा असलेले येमेनमधील हुती आणि लेबनॉनमधील हेजबोला हे गटही सक्रिय झाले असून त्यांनी लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, सौदी अरेबियाने इराणने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्यास गंभीर परिणाम सहन करावे लागतील, असा इशारा दिला आहे. गतवर्षी जून महिन्यात झालेल्या १२ दिवसांच्या युद्धापेक्षा या युद्धाची व्याप्ती आणि तीव्रता अधिक असल्याची प्रचीती पहिल्याच दिवशी आली.

इराणच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.३०च्या सुमाराला हल्ल्यांना सुरुवात झाली. पहिला हल्ला इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ पहिला हल्ला झाल्याचे माध्यमांनी प्रसारित केलेल्या दृश्यांमधून दिसले. त्यावेळी ते तिथे उपस्थित होते की नाही स्पष्ट होऊ शकले नाही. संपूर्ण इराणमध्ये हल्ले करण्यात आले असून राजधानी तेहरानवर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसत होते, तसेच स्फोटांचे आवाजही ऐकू येत होते.

जगभरातून चिंता व्यक्त; अमेरिका ठामच

तेहरानच्या जम्हुरी चौक आणि हसन अबाद चौकसह इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणात धूर दिसत होता. अन्य काही चित्रफितींमधून निवासी इमारती आणि किराणामालाच्या दुकानांवर धुरांचे ढग दाटले होते. तेहरानसह इसफाहान, कोम, कराज, शिराज, तब्रिझ आणि केरमानशाह या महत्त्वाच्या शहरांनाही अमेरिका-इस्रायलने लक्ष्य केले. असलुयेसह बंदरांच्या शहरांजवळही हल्ल्यांचे आवाज ऐकू आले. हा भाग इराणच्या तेल व्यापारासाठी महत्त्वाचा मानला जातो. या हल्ल्यांनंतर काहीच वेळात इराणची हवाई हद्द बंद करण्यात आल्याचे वृत्त तेथील ‘तस्निम’ वृत्तसंस्थेने दिले.

हल्ले कशासाठी?

इराणने अण्वस्त्र विकास कार्यक्रम गुंडाळावा याबाबत अमेरिका आणि इस्रायलकडून दबाव होता. इराण युरेनियम समृद्धीकरणाची पातळी अणुऊर्जा कार्यक्रमापुरती मर्यादित ठेवण्यास राजी झाला होता. मात्र क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमही आवरता घ्यावा ही अमेरिकेची मागणी त्यास मंजूर नव्हती. यासंबंधी वाटाघाटी ओमानमध्ये सुरू होत्या. त्यांच्या समाप्तीआधीच अमेरिका आणि इस्रायलने हल्ले सुरू केले.

भारताकडून शांततेचे आवाहन

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराणने संयम बाळगावा आणि चर्चा व मुत्सद्देगिरीचा वापर करून युद्ध टाळावे, तसेच सर्व नागरिकांच्या संरक्षणाची खबरदारी घ्यावी, असे आवाहन भारताने केले आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबद्दल भारताला चिंता वाटत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या प्रतिक्रियेत नमूद करण्यात आले आहे.

हवाई सेवा बंद

  • हल्ल्यानंतर भारतीय विमान कंपन्यांसह जगभरातील कंपन्यांनी पश्चिम आशियातील विमानसेवा स्थगित केली.
  • इराण, इराक, कुवेत, इस्रायल आणि बहारिन या देशांची हवाई हद्द शनिवारी पूर्ण रिकामी होती. युरोपीय महासंघाच्या हवाई वाहतूक नियामकांनी हवाई सेवा स्थगित करण्याची शिफारस केली.
  • ग्रीस, स्पेन, फ्रान्स, तुर्की, जपान, अझरबैजान, ब्रिटन, नॉर्वे इत्यादी देशांच्या विमान कंपन्यांनी विमान उड्डाण रद्द केल्याचे जाहीर केले.

शाळेवरील हल्ल्यात ८५ ठार

दक्षिण इराणमधील होर्मोझगान प्रांतामधील मुलींच्या शाळेला इस्रायलने लक्ष्य केले. त्यामध्ये किमान ८५ जणांचा मृत्यू झाला. तर मिनाब येथील हल्ल्यात अन्य ४५ जखमी झाले असे वृत्त इराणच्या माध्यमांनी दिले आहे. मिनाब शहरामध्ये इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड या निमनष्करी दलाचा तळ आहे.

हल्ले नेमके कुठे?

अमेरिका/ इस्रायलकडून इराणमधील तेहरान, कराज, कोम, उर्मिया, इसफाहान, केरमानशाह, शिराझ, मिनाब, चाबहार

इराणकडून इस्रायलमधील तेल अवीव, हायफा, रामाल्ला

कुवेत, कतार, बहारिन, यूएईतील अमेरिकी तळांवर

इराणच्या राजवटीकडून

असलेला धोका नष्ट करून अमेरिकी जनतेचे संरक्षण करणे हा आमचा उद्देश आहे. आमची कारवाई पूर्ण झाली की तुम्ही (इराणी जनतेने) तुमच्या सरकारचा ताबा घ्या. अनेक वर्षांमध्ये तुम्हाला मिळालेली ही कदाचित एकमेव संधी आहे. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

इराणकडे अण्वस्त्रे असता कामा नयेत. त्यामुळे संपूर्ण मानवतेला धोका निर्माण होणार आहे. आमच्या संयुक्त मोहिमेमुळे इराणी जनतेला त्यांचे भविष्य त्यांच्या हातात घेणे शक्य होणार आहे. – ,बेंजामिन नेतान्याहू, पंतप्रधान, इस्रायल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button