परदेशातील मैत्री आणि मदतीचे आमिष दाखवून रत्नागिरीतील उद्यम नगर येथील एका व्यक्तीला तब्बल २२ लाख २१ हजार ४०० रुपयांचा गंडा


परदेशातील मैत्री आणि मदतीचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एका व्यक्तीला तब्बल २२ लाख २१ हजार ४०० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात युनायटेड किंगडममधील एक नागरिक आणि दिल्लीतील एका तोतया महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, उद्यमनगर येथील पडवेकर कॉलनीमध्ये राहणारे सलील अब्दुल कादीर काझी यांची एका ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून युनायटेड किंगडममधील टिआगो फौरा याच्याशी ओळख झाली होती. २२ जुलै २०२५ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली. संशयित आरोपी टिआगो याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला होता. दरम्यान, टिआगो याच्याकडे दिल्ली एमिग्रेशन विभागात ६० हजार युके पाऊंड आणि सोने बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी पकडले गेल्याचे सांगण्यात आले.

​या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आणि हे चलन भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित करण्यासाठी पैशांची गरज असल्याचे भासवण्यात आले. यामध्ये दिल्ली येथील पासपोर्ट एमिग्रेशन ऑफिसर असल्याचे सांगणाऱ्या प्रिया शर्मा नावाच्या महिलेनेही आरोपीशी संगनमत करून फिर्यादीला पैसे भरण्यास प्रवृत्त केले. आरोपीने ही रक्कम लवकरच परत करण्याचे आश्वासन दिल्याने, फिर्यादी सलील काझी यांनी आपल्या आयसीआयसीआय आणि एचएसबीसी बँक खात्यांवरून वेळोवेळी एकूण २२ लाख २१ हजार ४०० रुपये पाठवले.

​मात्र, मोठी रक्कम उकळल्यानंतरही आरोपींनी पैसे परत न करता फसवणूक केल्याचे लक्षात येताच काझी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी टिआगो फौरा आणि प्रिया शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button