
नोकरीचं आमिष दाखवून हातात दिला चॉकलेट बॉक्स, पण आत निघाला 8.71 कोटींचा गांजा!
पुणे : पुणे विमानतळावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोकरीचं आमिष देवून काही तरुणांना विदेशात बोलावलं होतं. पण तिथे त्याना नोकरी मिळाली नाही. त्यानंतर या तरुणांना घर परत पाठवल्यावर त्यांच्याकडे चॉकलेटचे बॉक्स देण्यात आले.
या तरुणांना विमानतळावर प्रशासनाने अडवले आणि त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे बॉक्स आढळले. संबंधित बॉक्स हे चॉकलेट बॉक्स असल्याचं त्यांनी सांगितलं. पण अधिकाऱ्यांनी ते बॉक्स उघडले असता त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गांजा आढळला. त्यामुळे अधिकारी देखील विचारात पडले. या प्रकरणाची गंभीर दखल अधिकाऱ्यांनी घेतली आहे. पुणे विमानतळावरच्या या घटनेची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
नेमकं काय घडलं?
नोकरीच्या आमिषाने बँकॉकला गेलेले चार जण परतताना चॉकलेटचे बॉक्स घेऊन आले. पण त्या बॉक्समध्ये चॉकलेट नव्हतंच. आत होता तब्बल 8.71 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा! पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने ही मोठी कारवाई करत 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार प्रवासी बँकॉकहून पुण्यात विमानाने आले. विमानतळावर तपासणीदरम्यान त्यांच्या बॅगमध्ये संशयास्पद चॉकलेटचे बॉक्स आढळले. अधिकाऱ्यांनी बॉक्स उघडून पाहिल्यावर धक्काच बसला. चॉकलेटच्या ऐवजी आत व्यवस्थित पॅक करून हायड्रोपोनिक गांजा लपवून ठेवण्यात आला होता.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या चौघांना बँकॉकमध्ये नोकरी मिळेल असे सांगून बोलावण्यात आले होते. मात्र तिथे गेल्यावर “नोकरीची संधी नाही” असं सांगितलं गेलं. परतीच्या प्रवासात त्यांना प्रत्येकी एक चॉकलेटचा बॉक्स देण्यात आला आणि तो पुण्यात घेऊन जाण्यास सांगितलं. त्यांना आत काय आहे याची कल्पनाही नव्हती, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पुणे विमानतळावर या चौघांना घेण्यासाठी आलेल्या आणखी एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही व्यक्ती रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. तर विमानाने आलेले चारही जण झारखंडमधील असल्याचं सांगितलं जात आहे.
या कारवाईत एकूण ८.७१ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. पुणे विमानतळावर यंदाच्या वर्षातील ही सर्वात मोठी ड्रग्ज कारवाई मानली जात आहे.
एअर इंटेलिजन्स युनिटकडून सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या तस्करीमागे नेमकं कोणतं मोठं रॅकेट आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.




