
नवानगर येथे कारची सिमेंटच्या मोरीला धडक
दापोली तालुक्यातील नवानगर येथे आज सकाळी सुमारे साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान कारचा अपघात झाल्याची घटना घडली. दापोली येथून खेडकडे पालखीला जात असताना ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या मोरीला जोरदार धडकली.मिळालेल्या माहितीनुसार, नवानगर परिसरातील रस्ता अरुंद असून रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या मोरीमुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान संबंधित कार चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या मोरीवर जाऊन आदळले आणि हा अपघात घडला.
या अपघातात कारमधील चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.




