धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

अरूंद रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी कलंडली : रस्त्याच्या रुंदीकरणाची आग्रही मागणी

राजापूर : तालुक्याचे आराध्य दैवत आणि प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता अरूंद असल्याने या मार्गावरून प्रवास करताना भाविकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांना या अरूंद रस्त्याचा फटका बसत आहे. मंगळवारी अशाच बाहेरून आलेल्या एका भाविकाची स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात अडकल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राजापूर शहराला लागूनच असलेल्या श्री देव धूतपापेश्वर मंदिराची ख्याती संपूर्ण राज्यात पसरलेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. त्यातच शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून या मंदिराचे जतन आणि सुशोभिकरण केले आहे. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. परिणामी मागील एक-दोन वर्षांपासून भाविकांसह पर्यटकांचा ओढा देखील वाढला आहे; मात्र राजापूर शहरातून मंदिराकडे जाणारा रस्ता हा फार अरूंद व तीव्र उताराचा आहे. त्यामुळे दोन गाड्या समोरासमोर आल्या की एकमेकाला बाजू देताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.

नुकतीच श्री देव धूतपापेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव पार पडला. या उत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते; मात्र अरूंद रस्त्यामुळे मंदिरापासून जवळपास एक किलोमीटर लांब गाड्या पार्क करून भाविकांना चालत मंदिर गाठावे लागले होते. त्यामुळे श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अरूंद आणि तीव्र उताराच्या रस्त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांना रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडण्याचे प्रकार घडत आहेत.

मंगळवारी अशा पद्धतीने गणेश मंदिराजवळ रस्त्याचा अंदाज न आल्याने एका भाविकाची गाडी थेट गटारात कलंडली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे काही अंशी नुकसान झाले आहे. अखेर अन्य भाविक व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गाडी रस्त्यावर काढण्यात आली. मात्र या घटनेने श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या अरूंद रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येत्या काही दिवसांत परीक्षांचा काळ संपून पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. श्री देव धूतपापेश्वरच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची, पर्यटकांची मोठी संख्या लक्षात घेऊन रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button