
दापोली पंचायत समिती सभापतीपदी उन्मेष राजे; उपसभापतीपदी नम्रता तोडणकर
दापोली, ता. ९ :- दापोली पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे तालुका प्रमुख उन्मेष राजे यांची सभापतीपदी, तर नम्रता तोडणकर यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. या निवडीमुळे दापोली तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दापोली पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्या उपस्थितीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. आवश्यक त्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर सभापतीपदी उन्मेष राजे आणि उपसभापतीपदी नम्रता तोडणकर यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
निवडीची घोषणा होताच सभागृहात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर खालुबाजा वाजवत सभागृहापासून पंचायत समितीच्या दालनापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर दोघांनाही त्यांच्या अधिकृत दालनात नेऊन पदग्रहणाचा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर, उपनेते संजय कदम, प्रदीप सुर्वे, प्रकाश कालेकर, सुनील दळवी, पक्ष प्रतोद व गटनेते नीलेश शेठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





