
दापोलीत आरोग्य सेविकेला मारहाण; आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी
दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई उपकेंद्र खेर्डी येथील आरोग्य सेविका श्रीम. जयश्री टिळे यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा आरोग्य विभागातील कर्मचारी व संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोग्य सेविका व कर्मचारी हे जनतेच्या आरोग्यासाठी दिवस-रात्र सेवा देत असतात. अशा कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या मारहाणीच्या घटना अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
सदर प्रकरणात एफआयआर दाखल झाला असला तरी आरोपीला त्वरित अटक करून न्याय मिळवून द्यावा. अन्यथा आरोग्य कर्मचारी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येईल, असेही डॉ. निवेंडकर यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.




