जिल्हा ग्रंथोत्सव २०२५ चे मोठ्या उत्साहात उद्घाटनपुस्तकांमुळेच आपण मोठे – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी, दि. २५ )- वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि पुस्तकांकडे वाचकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘दोन दिवसीय रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव २०२५’ चे उद्घाटन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात झाले.
​दिमाखदार ग्रंथदिंडीने सुरुवात

ग्रंथोत्सवाचा प्रारंभ मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अशा भव्य ग्रंथदिंडीने झाला. या दिंडीचे पूजन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडीत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे, लेझीम पथक आणि ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोठ्या संख्येने विद्यार्थी, वाचक आणि ग्रंथप्रेमी या दिंडीत सहभागी झाले होते.

पुस्तकांमुळेच आपण मोठे होतो: जिल्हाधिकारी मनुज जिंदल
​उद्घाटनपर भाषणात जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी वाचनाचे महत्त्व विशद केले. त्यांनी स्वतःच्या शालेय जीवनातील आठवणी सांगत त्यांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल माहिती दिली. “पुस्तकांमुळेच आपण मोठे होतो आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी वाचकांना पुन्हा ग्रंथालयांकडे वळवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
​​या प्रसंगी उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले: रवींद्र कालेकर (संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ): ग्रंथालये समाजाला नवी दिशा देण्याचे काम नियमितपणे करत असल्याचे त्यांनी नमूद केले.


प्रकाश देशपांडे (ज्येष्ठ साहित्यिक): त्यांनी ग्रंथालय सेवकांचे कौतुक करत ग्रंथालये ही केवळ वाचनालये न राहता संस्कृतीचा ठेवा जपणारी ‘संग्रहालये’ व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
​ महेश सोनजे (ग्रंथालय संचालनालय, मुंबई): पालकांनी स्वतः वाचन करून मुलांसमोर आदर्श ठेवावा, जेणेकरून मुले मोबाईल सोडून वाचनाकडे वळतील, असा सल्ला त्यांनी दिला.
​दिपक मेंगाणे (शिक्षणाधिकारी – माध्यमिक): वाचनाने मनुष्य प्रगल्भ होतो, असे सांगत त्यांनी एका ग्रंथालयावर आधारित लेखाचे वाचन केले.
​कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विलास कुवळेकर यांनी आपल्या भाषणात मायबोली मराठीचे विविध अंग आणि साहित्यिकांची माहिती देत, काव्यपंक्तींच्या माध्यमातून श्रोत्यांची मने जिंकली.
​ कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय निरीक्षक हेमंत काळोखे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक यांनी केले. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विभावरी जोईल, भास्कर झोरे तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे सुधाकर वाघ, विजय आम्रे आणि वैष्णवी शिवगण यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button