जयगड समुद्रात मध्यरात्री अवैध मासेमारीवर सर्जिकल स्ट्राईक; ३ नौका जप्त

एका तासाच्या 'हाय-स्पीड चेस'नंतर मत्स्यव्यवसाय विभागाची मोठी कारवाई; बेकायदा एलईडी मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशांची तंतोतंत अंमलबजावणी

रत्नागिरी :
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अवैध मासेमारीविरुद्ध पुकारलेल्या एल्गाराचा परिणाम आता रत्नागिरीच्या समुद्रात दिसू लागला आहे. मंत्री नितेश राणे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच बेकायदा मासेमारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याच इशाऱ्याला अनुसरून काल मध्यरात्री रत्नागिरीच्या जयगड समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाने एक धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’ राबवले. प्रतिकूल हवामान आणि उग्र लाटांचा सामना करत विभागाने एलईडी लाईटचा वापर करून मासेमारी करणाऱ्या तीन नौकांना रंगेहाथ पकडले असून, यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या अंधारात एलईडी लाईटच्या साहाय्याने मासेमारी सुरू असल्याची गुप्त माहिती विभागाला मिळत होती. गस्ती नौकेसाठी डिझेल नसल्याची चर्चा पसरवून मासेमार निर्धास्त झाले होते, मात्र मंत्री नितेश राणे यांच्या कडक भूमिकेमुळे विभागाने गुप्तपणे रणनीती आखली. सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अचानक डिझेलची व्यवस्था करून कोणतीही चाहूल लागू न देता गस्ती नौका जयगडच्या दिशेने वळवण्यात आली.

मध्यरात्रीच्या सुमारास गडद अंधार आणि जोरदार वाऱ्याची तमा न बाळगता ५ परवाना अधिकारी आणि सुरक्षा पथकाने समुद्रात धडक दिली. या पथकात चिन्मय जोशी, पार्थ तावडे, स्वप्नील चव्हाण, दीप्ती साळवी, स्मितल कांबळे तसेच तुषार कर्गुटकर, विनायक शिंदे, सुजन पवार व साईनाथ साळवी यांचा समावेश होता. मोहिमेदरम्यान पथकाने अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांना वेढा घातला. यावेळी एका नौकेने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने समुद्राच्या मध्यभागी तब्बल एक तास या नौकेचा थरारक पाठलाग करून तिला अखेर जेरबंद केले.

या कारवाईत इम्तियाज हाजी हसनमिया मुकादम यांची ‘H. Imtiyaz’ (IND-MH-4-MM-1961), लीना लक्ष्मण बिरजे यांची ‘Lakshmi’ (IND-MH-4-MM-506) आणि अब्दुल लतीफ अली होडेकर यांची ‘Aqsa Imran’ (IND-MH-4-MM-1971) या तीन नौका जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (MMFRA) अंतर्गत कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अहवाल सहाय्यक आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. गस्ती नौका आणि ड्रोनच्या साहाय्याने रत्नागिरी जिल्हा सध्या राज्यात अवैध मासेमारीविरोधी कारवाईत आघाडीवर असून, ना. नितेश राणे यांच्या थेट पाठपुराव्यामुळेच ही ‘रेकॉर्डब्रेकिंग’ कारवाई यशस्वी झाली हे नक्की !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button