जनतेने दिलेला कौल हा विश्वासाचे प्रतीक : माजी खासदार विनायक राऊत

रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समितीतील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

रत्नागिरी : जनतेने दिलेला कौल हा विश्वासाचे प्रतीक असून, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता विकासाभिमुख कामगिरी करणे हीच खरी अपेक्षा असल्याचे शिवसेना नेते, सचिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी अधोरेखित केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका केवळ सत्तांतराचे माध्यम नसून लोकसेवेची नवी जबाबदारी स्वीकारण्याचा टप्पा असतो, याच भावनेतून माजी खासदार राऊत यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सन्मान करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी ठरलेले जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, विशाखा कुवळेकर आणि नेहा माने तसेच पंचायत समिती सदस्य अपर्णा जाधव व दत्ताराम लाखण यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

तसेच निसटत्या फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांचाही यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत, जनतेसाठी लढणं हे महत्त्वाचं होतं आणि ते तुम्ही केलंत, असे सांगून भविष्यात अधिक जोमाने काम करण्यासाठी त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा देत, सत्तेच्या समीकरणांपलीकडे जाऊन जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
विशेषतः विरोधी बाकावरूनही स्वाभिमानी आणि लढवय्या बाणा जपत जनहिताच्या मुद्द्यांवर प्रभावी भूमिका मांडण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. राजकारणातील स्पर्धा ही विचारांची असली, तरी लोकसेवा हा समान धागा असल्याचे अधोरेखित करत, नव्या नेतृत्वाकडून सकारात्मक आणि जबाबदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button