
चिपळूण शहरातील नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीमध्ये १३ लाखांची फसवणूक
चिपळूण शहरातील नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीमधील दोन कर्मचार्यांनी खासगी बिल बुक तयार करून दुकानातील वस्तू ग्राहकांना विकल्या. तसेच ऑनलाईन स्वरुपातील रक्कम स्वतःच्या क्युआर कोडद्वारे स्वीकारली. यातून त्यांनी तब्बल १३ लाख १६ हजार ५८७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार २०२२ ते २०२५ या कालावधीत घडला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी सुमित संजय शिंदे (कोंढे) याच्यासह महिला कर्मचारी सिमयंती गणेश तांबिटकर हिच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची फिर्याद हेड मॅनेजर महेंद्र मधुकर शिंदे (३३, रत्नागिरी) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालाधीत शहरातील नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीमध्ये सुमित शिंदे याने स्वतःचे खासगी पावती पुस्तक तयार करून घेतले. त्यावर सिमयंती तांबिटकर हिच्या सह्या घेतल्या. त्या खासगी पावती पुस्तकाद्वारे नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीमधील वस्तू रोख स्वरुपात ग्राहकांना विकल्या. तर ऑनलाईन रक्कमेसाठी ग्राहकांना स्वतःच्या क्युआर कोडवर स्कॅन करायला लावून त्याद्वारे स्वतःच्या बँक खात्यामध्ये परस्पर रक्कम घेतली. यातूनच त्याने १३ लाख १६ हजार ५८७ रुपयांची फसवणूक केली.
हा प्रकार हेड मॅनेजर महेंद्र शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्या दोघांवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.www.konkantoday.com




