चिपळूण तालुक्यातील देवखेरकीत जळालेला मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ


चिपळूण तालुक्यातील देवखेरकी परिसरात एका हापूस आंब्याच्या बागेजवळ जळालेला मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, एका निळ्या रंगाच्या बॅगेत मृतदेह ठेवून तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी जळालेल्या बॅगेचे अवशेष तसेच दोन लोखंडी रॉड आढळून आले असून, ते या प्रकरणाशी संबंधित असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपूर्वी बागेत काम करणाऱ्या एका मजुराला हा मृतदेह दिसला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण असल्याने तो घाबरून गेला आणि भीतीपोटी त्याने याबाबत कोणालाही काही सांगितले नाही. अखेर, मनावरील ताण वाढल्यानंतर त्याने ही माहिती बागमालकाला दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बराच कालावधी उलटल्याने मृतदेह पूर्णपणे जळून त्याचा सांगाडा उरला असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रत्नागिरी येथून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरील अवशेष आणि हाडांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

या घटनेत सापडलेले अवशेष अल्पवयीन मुलाचे किंवा मुलीचे असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. हा प्रकार पूर्वनियोजित खून असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्यात किंवा आसपासच्या भागात कोणते बालक बेपत्ता आहे का, याचीही माहिती पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहे. या घटनेमुळे देवखेरकी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्हेगाराचा तातडीने शोध घेण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button