चिपळुणात डांबर वितळवताना आग; अग्नीशमन दलाने अर्ध्या तासात मिळवले नियंत्रण

चिपळूण : गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी शहरातील पालिकेसमोरील खेडेकर क्रीडा संकुलाच्या मैदानात डांबर वितळवण्याच्या कामादरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी पहाटेपासून डांबर लाकडाच्या साह्याने वितळवण्याचे काम सुरू होते. दुपारच्या कडक उन्हात डांबर पूर्णपणे वितळून ड्रमच्या बाहेर पडल्याने अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने तीव्र स्वरूप धारण करत परिसरात धुराचे लोट पसरले. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुमारे अर्धा तास पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. यावेळी पालिकेचे अधिकारीही उपस्थित होते.

या आगीत ड्रममधील बहुतांश डांबर जळून खाक झाले असून काही काळ कामकाज ठप्प झाले होते. घटनेमुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button