
चिपळुणात एसटी बस चालक-वाहकास मारहाण
चिपळूण-तिवरे बसच्या चालक आणि वाहकास मद्यपीने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ४.१५ वाजता घडली. यात चालक जखमी झाला असून वाहकाचे ८०० रुपये बसमध्ये हरवले. याप्रकरणी प्रकाश बाबा कोकरे (३१, ’स्वयंदेव-नांदीवसे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद चालक उमेश सुखदेव हजारे (३६, कापसाळ-दुकानखोरी) यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आपल्या ताब्यातील बस घेऊन तिवरेकडे जात असताना प्रकाश कोकरे हा दारू पिऊन बसमधून प्रवास करीत होता. त्याचे तिकिट कळकवणे फाट्यापर्यंत होते. हा फाटा आल्याने वाहक पाराजी सरवदे यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले असता त्याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे चालक हजारे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने दोघांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यात चालक हजारे, वाहक सरवदे जखमी झाले. तसेच त्यांच्या खिशातून ८०० रुपये बसमध्ये पडून हरवल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे अलोरे-शिरगाव पोलिसांनी प्रकाश याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com




