
चालू आर्थिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्हा खनिकर्म’ला ९८ कोटी वसुलीचे उद्दिष्ट
रत्नागिरी जिल्हा खनिकर्म विभागाला चालू आर्थिक वर्षासाठी देण्यात आलेले ९८ कोटी रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे यंदा कठीण जाणार असल्याचे चित्र उभे आहे. प्रशासकीय मान्यतांमधील विलंब आणि मोठ्या प्रकल्पांची पूर्तता यामुळे महसुलाचे स्रोत आटले आहेत. विभागाची उद्दिष्ट मजल जेमतेम ५० कोटी रुपयांपर्यंतच जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ९८ कोटींचे लक्ष्य आणि प्रत्यक्ष वसुली यातील ही निम्मी तफावत प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरत आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्याच्या तिजोरीत जलसंपदा विभागाच्या कामांमधून सुमारे ३३ कोटी रुपयांचा मोठा महसूल जमा झाला होता. मात्र, यंदा या विभागाच्या अनेक कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. परिणामी, प्रत्यक्ष कामांना सुरुवात न झाल्याने त्यातून मिळणारी कोट्यवधींची रॉयल्टी यावर्षी थांबली आहे. प्रशासकीय लालफितीच्या कारभाराचा थेट फटका जिल्ह्याच्या एकूण महसूल उत्पन्नाला बसला आहे.www.konkantoday.com




