घशामध्ये अडकलेली सेफ्टी पिन काढण्यात वालावलकर रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश

दापोली येथील चिमुकली सुखरूप. ..

चिपळूण : वणंद (ता. दापोली) गावातील एका सात महिन्याच्या बाळाला एका महिन्यापासून सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. त्यासाठी बाळाच्या आई- वडिलांनी दापोली येथील बालरोगतज्ञांना दाखविले असता त्यांनी एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. एक्स-रे मध्ये घशामध्ये सेफ्टी पिन अडकल्याचे निदर्शनास आले व बालरोग तज्ञांनी त्वरित पेशंटला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात जाण्यास सांगितले.
वालावलकर रुग्णालयात येताच कान -नाक -घसा विभागाच्या डॉ. सीजा यांनी पेशंटला तपासले व प्राथमिक तपासणी करून घेतली. क्षणाचाही विलंब न करता पेशंटला ऑपरेशन थेटरमध्ये घेण्यात आले व कान-नाक-घसा विभागाचे तज्ञ डॉ. राजीव यांनी युसोफॅगोसकोपी करून सेफ्टी पिन काढण्यात यश आले. सेफ्टी पिन उघडी असल्याकारणाने ती अन्ननलिकेसाठी धोकादायक होती म्हणूनच ती लवकरात लवकर बाहेर काढण्याची गरज होती. तसेच एक्स-रे मध्ये ती घशामध्ये दिसत होती; परंतु ऑपरेशनला घेईपर्यंत ती अन्ननलिकेत गेली होती. त्यामुळे हे अति जोखमीचे ऑपरेशन डॉ. राजीव व डॉ. सीजा यांनी लीलया पार पाडले. तसेच सात महिन्याच्या बाळाला भूल देण्याचे अतिशय अवघड काम रुग्णालयाच्या भूल तज्ञांनी कुशलतेने केले व ऑपरेशन नंतर लागणारे लहान मुलांचे आयसीयू याठिकाणीच असल्याकारणाने ऑपरेशन नंतरची रिकव्हरी सुखकर झाली. कान-नाक- घसा तज्ञ, भूलतज्ञ, बालरोग तज्ञ अशा तज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांनी सात महिन्यांच्या चिमुकलीला जीवनदान मिळाले. सद्यस्थितीत या चिमुकलीची प्रकृती उत्तम असून काही दिवसांत तिला घरी सोडण्यात येईल.
दरम्यान, अशा अति जोखमीच्या शस्त्रक्रिया यापूर्वी देखील वालावलकर रुग्णालयात झालेल्या आहेत. या ठिकाणी असलेले डॉक्टर व अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे हे रुग्णालय रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. अनेक शस्त्रक्रिया या महात्मा फुले आरोग्य योजनेतुन केल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांवरील आथिर्कभार देखील कमी होत आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका सौ. सुवर्णा पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button