
“ग्राहक देवो भव” घोषणा केवळ घोषवाक्य म्हणून उपयोगाची नाही
पुरवठा निरीक्षण अधिकारी ए. बी. देशमुख यांचे प्रतिपादन
खेड : जोपर्यंत एमआरपीसोबत उत्पादन खर्च सार्वजनिक केला जात नाही तोपर्यंत खरी ग्राहक संरक्षण व्यवस्था अस्तित्वात येणार नाही, तसेच वस्तूंवर अवास्तव एमआरपी छापून ग्राहकांप्रती कर्तव्य पूर्ण झाले असे समजणे चुकीचे आहे. त्यामुळे “ग्राहक देवो भव” घोषणा केवळ घोषवाक्य म्हणून उपयोगाची नाही, असे प्रतिपादन येथील तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेचे निरीक्षण अधिकारी ए. बी. देशमुख यांनी केले.
येथील तहसील कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक ग्राहक दिनी कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रम १६ मार्च रोजी तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी पुरवठा निरीक्षक श्रीमती आर. आर. ढवळ, महसूल सहाय्यक एन बी. काळबोंडे, खेड ग्राहक पंचायत शाखेचे अध्यक्ष विजय येरुणकर, सदस्य योगेश डेरवणकर, अक्षय मोरे, दिवाकर प्रभू, प्रसाद मोडसिंग, जयेश कदम, महसूल सहायक एस. एस. यादव , डी. ए. चव्हाण आदींसह ग्राहक उपस्थित होते.
श्री. देशमुख पुढे म्हणाले, “कोणतीही कंपनी आपले उत्पादन बाजारात आणताना त्यावर एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) छापते. यामागचा मूळ उद्देश असा की, ग्राहकाला ती वस्तू एमआरपी पेक्षा जास्त दराने विकली जाऊ नये आणि विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट होऊ नये. जर कोणी एमआरपीपेक्षा जास्त किंमतीला वस्तु विकत असेल तर ग्राहकाला त्याविरोधात तक्रार करून दाद मागण्याचा अधिकार आहे.”
प्रास्ताविक महसूल सहाय्यक एन. बी. काळबोंडे यांनी केले. सूत्रसंचालन खेड ग्राहक पंचायत शाखेचे अध्यक्ष विजय येरुणकर यांनी केले.




