गॅस दरवाढ रद्द करा! काँग्रेसचे राज्यभर ‘सरेंडर दी सिलिंडर’ आंदोलन!

मुंबई : इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आणि एलपीजी गॅसदरात करण्यात आलेली वाढ याविरोधात काँग्रेसने राज्यभरात शुक्रवारी आंदोलन केले.

एलपीजी गॅस ६० रुपयांनी महाग करून भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खोल दरीत लोटले आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही दरवाढ झालेली आहे. युद्धाचे कारण पुढे करून जनतेची लूट करण्याऐवजी सरकारने ही दरवाढ तात्काळ रद्द करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅस संदर्भात सर्व घटकांशी चर्चा करून संसदेत धोरण जाहीर करावे, अशा विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या.

देशातून गॅस सिलिंडर गायब आहे तर संसदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी गायब आहेत. नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर शरण गेले आहेत. त्याची मोठी किंमत सामान्य माणसाला मोजावी लागत आहे. घरातून गॅस गायब आहे तर व्यासायीक सीलिंडर मिळत नसल्याने छोटे व्यवसाय, हॉटेल्स, खाणावळी बंद कराव्या लागत आहेत. राज्यातील भाजपा महायुती सरकार लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिल्याचा ढोल पिटत असते, पण दुसरीकडे मात्र महागाई करून या लाडक्या बहिणींची लूट करत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्र्यंबकेश्वर येथील आंदोलनादरम्यान केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी गॅस वितरकाच्या कार्यालयात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली तसेच गॅस सीलिंडर घेण्यासाठी आलेल्या महिलांशी संवाद साधून गॅस टंचाईबद्दल त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेतले. गॅस दरवाढीवर महिला संतप्त असून भाजप सरकारने जगणे महाग केले आहे, अशा भावना महिलांनी बोलून दाखवल्या. नागपूर, पुणे, ठाणे, वर्धा, बुलढाणा, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, पालघर, भिवंडी, कल्याण डोंबिवली, धाराशिव, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, ठाणे, पनवेल सह सर्व जिल्ह्यात गॅस दरवाढ व टंचाईविरोधात आंदोलन करण्यात आले.

विधिमंडळातही गॅस सीलिंडर

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेने विजय वडेट्टीवार आणि आमदार नाना पटोले यांनी गॅसची प्रतिकृती विधिमंडळ परिसरात झळकावत गॅस तुटवडा व दरवाढीचा निषेध नोंदवला. ‘सरेंडर दी सीलिंडर’ अशा आशयाचे फलक यावेळी झळकावण्यात आले व सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. शासकीय वसतीगृहांमध्ये मुलांना जेवण नसल्याने ते आता गावाला जायला निघाले आहेत. हॉटेल्स बंद झाली आहेत, घरगुती गॅस व्यवस्था बंद व्हायला सुरुवात झाली आहे. लोक रांगेत उभे आहेत, पण राज्याचे आणि केंद्रातील सरकार सगळ्या परिस्थितीत झोपलेल्या अवस्थेत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button