गॅस गळतीमुळे नाशिक हादरलं; खोदकामामुळे अनर्थ ओढवला!

नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातील बहुतांश रस्त्यांवर चाललेल्या खोदकामांनी शहरवासीय आधीच त्रस्त झाले असताना आता ही कामे नव्या संकटाला निमंत्रण देत असल्याचे समोर आले आहे. सोमवारी रात्री गंगापूर रोड भागातील पाईपलाईन मार्गावर अशाच एका खोदकामात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी अर्थात ‘एमएनजीएल’ची वाहिनी फुटून एलपीजी गॅसची गळती सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. खोदलेल्या चारीतून गॅस बाहेर पडत असताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत होते.

पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रमुख २८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी आधीच संबंधित मार्गांवर वीज, पाणीपुरवठा वाहिन्या, ऑप्टिकल फायबर, गटार आणि पावसाळी गटार आदींची व्यवस्था केली जात आहे. यासाठी चाललेल्या खोदकामांनी सर्वत्र बिकट स्थिती झाली आहे. अनेक रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू असून काही ठिकाणी एकेरी मार्ग, तर काही ठिकाणी दुरून फेरा मारावा लागत आहे. वाहतूक कोंडी, धूळ अशा समस्यांना सामोरे जावे लागत असताना त्यात गॅस गळतीची भर पडली.

सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गंगापूर रोडलगतच्या पाईपलाईन रस्त्यावर ही घटना घडली. या ठिकाणी गटारीच्या कामासाठी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू होते. यावेळी जमिनीखालील ‘एमएनजीएल’ची गॅस वाहिनी फुटली आणि मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसची गळती सुरू झाली. सातपूर औद्योगिक वसाहतीकडे जाणारा हा अतिशय वर्दळीचा मार्ग असून रस्त्याच्या दुतर्फा मोठी नागरी वस्ती आहे.

अकस्मात घडलेल्या या प्रकाराने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. उपमहापौर विलास शिंदे यांचा हा प्रभाग आहे. स्थानिकांकडून माहिती मिळताच त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले. अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. गटारीच्या कामासाठी चारीसारखे खोदकाम सुरू होते, तिथून गॅसची गळती सुरू होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने व्हॉल्व्ह बंद करण्यात आला, असे ‘एमएनजीएल’च्या नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. परंतु परिसरात एक ते दीड तास गॅस गळती सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

गॅस वाहिनीच्या दुरुस्तीसाठी पथक तैनात करण्यात आले आहे. पुढील एक ते दीड तासात हे काम पूर्ण होईल. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. मनपाचे गटारीचे काम सुरू असताना एलपीजी गॅस वाहिनी फुटल्याचे कक्षाकडून सांगण्यात आले. याआधीही खोदकामात ‘एमएनजीएल’ची गॅस वाहिनी फुटली होती, याकडे नागरिकांकडून लक्ष वेधले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button