
खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणी नागरीक ढसाढसा रडले, तेहरानमध्ये लोटला जनसागर; भारतात काश्मीरमध्येही रस्त्यावर उतरले लोक
ईराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी खामेनेई यांच्या कार्यालयावर हल्ले केले होते. इराणी माध्यमांनीसुद्धा याची माहिती दिली आहे.इराणमधील टीव्ही अँकरला खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी देताना रडू कोसळलं. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणने नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा केलीय. खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई आता इराणचे सर्वोच्च नेते असणार आहेत. खामेनेई यांच्या मृत्यूमुळे इराणमध्ये शोककळा पसरली आहे. इराणी नागरिक मशिदींमध्ये एकत्र येत शोक व्यक्त केला. यावेळी अनेक नागरिकांना अश्रू रोखता आले नाहीत. काही इराणी नागरिक ढसाढसा रडत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
इराणी वृत्तसंस्था आयआरएनएने दिलेल्या वृत्तानुसार, इस्लामी क्रांतीचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा शनिवारी सकाळी इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मंत्रिमंडळाने ४० दिवसांचा दुखवटा आणि ७ दिवस सुट्टी जाहीर केली आहे. खामेनेई हे शहीद झाल्याचं सरकारी वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. खामेनेई यांच्यासोबत त्यांची मुलगी, जावई, सून आणि एक नातूही मृत्यूमुखी पडला.




