क्षत्रिय मराठा प्रिमियर चषक क्रिकेट स्पर्धा

शिवभक्त मराठा, तोरणा टायटन्स विजेता

रत्नागिरी : येथील क्षत्रिय मराठा मंडळ आयोजित पहिल्या क्षत्रिय मराठा प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद झाडगाव येथील शिवभक्त मराठा या संघाने पटकावले, तर साईनगरच्या मराठा वॉरियर्स संघाला उपविजेतेपद मिळाले. महिलांच्या स्पर्धेचे विजेतेपद तोरणा टायटन्स व उपविजेतेपद रायगड रायडर्सने पटकावले. विजेत्यांना नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, नगरसेविका सौ. पूजा पवार आणि मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दोन दिवस ही स्पर्धा शांतीनगरच्या शिवरुद्र टर्फ मैदानावर सुरू होती. अंतिम सामन्यात शिवभक्त मराठा संघाने ४ षटकांत ५२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मराठा वॉरियर्स संघाने झुंज दिली, परंतु त्यांचा २८ धावांनी पराभव झाला. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज ओंकार घाडी (७ सामने, १५१ धावा), उत्कृष्ट गोलंदाज वेदांग मोरे (७ सामने, १० बळी), उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शैलेश सावंत यांना सन्मानित केले. मालिकावीर सन्मान ओंकार घाडी (१५१ धावा, ४ बळी) याला इलेक्ट्रिक बाईक बक्षीस म्हणून देण्यात आली. विजेत्या पुरुष संघाला २५ हजार रुपये आणि उपविजेता संघाला १५ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आला.

महिलांच्या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज नंदिता सावंत, उत्कृष्ट गोलंदाज उत्तरा दळवी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रश्मी घाग यांना सन्मानित केले. मालिकावीर सन्मान नंदिता सावंत यांना १५ हजार रुपयांची पैठणी देऊन गौरवण्यात आले. महिला विजेता संघाला ७,७७७ रुपये व उपविजेत्या संघाला ५,५५५ रुपये व चषक देऊन सन्मान करण्यात आला. स्पर्धेत पंच म्हणून भाऊ तोडणकर, पर्णिकेश सुर्वे, अमेय बारगोडे यांनी काम पाहिले. शिवभक्त मराठा संघाचे संघमालक ओमेगा स्टेशनरी २.० व मराठा वॉरियर्स, साई नगर संघाचे मालक वेदगंध अ‍ॅग्रोचे संचालक याप्रसंगी उपस्थित होते.

समालोचक चिन्मय साखरकर याचा सन्मान करण्यात आला. नाचणे, मिऱ्या, शिरगाव, टेंभ्ये, कसोप, कोळंबे, फणसोप, पाली, खेडशी, टिके, कासारवेली आदी गावातील आणि शहरी विभागातील पुरुषांचे २४ संघ व महिलांचे ४ संघ असे २८ संघ या स्पर्धेत उतरले होते. पहिल्याच वर्षी मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे दरवर्षी ही क्षत्रिय मराठा प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धा दरवर्षी घेण्याची मागणी संघांनी केली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्षत्रिय मराठा मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. अमित कदम यांनी सूत्रसंचालन केले.

बक्षीस वितरणाप्रसंगी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे म्हणाल्या की, मराठा समाजातील तरुणांना आज स्पर्धेतून संधी मिळाली. समाजाची एकदा, जिद्द व शिस्त सर्व समाजापुढे जाणार आहे. समाजाच्या विकासासाठी स्पर्धा उपयुक्त ठरेल. यातून चांगले खेळाडू पुढे येणार असून त्यांनी सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन समाजाचे नाव मोठे करा. मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी झाले पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button