कोकणातील फळ वाईन उद्योगाला द्राक्ष वाईनप्रमाणे सवलती द्याव्यात : आ. शेखर निकम

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी कोकणातील फळ प्रक्रिया उद्योगाचा मुद्दा उपस्थित करत आंबा, काजू, फणस, जांभूळ व करवंद यापासून तयार होणाऱ्या वाईनला द्राक्ष वाईनप्रमाणे सवलती देण्याची मागणी केली.

सभागृहात बोलताना त्यांनी सांगितले की, द्राक्ष वाईन निर्मितीसाठी राज्य सरकारकडून विविध करसवलती, परवाना शुल्कातील सवलती तसेच विक्री केंद्रांना प्रोत्साहनपर धोरण दिले जाते. मात्र कोकणातील स्थानिक फळांपासून तयार होणाऱ्या वाईन उद्योगावर एक्साइज विभागाकडून सुमारे ३०० पट अधिक शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे नवउद्योजकांवर मोठा आर्थिक बोजा पडत असून उद्योगाच्या वाढीला अडथळा निर्माण होत आहे.
सध्या कोकणात आंबा, काजू, फणस, जांभूळ आणि करवंद या फळांपासून वाईन निर्मितीचे प्रयोग व उत्पादन सुरू आहे. या उद्योगाला चालना मिळाल्यास स्थानिक शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.

त्यामुळे द्राक्ष वाईनप्रमाणेच करसवलती, परवाना प्रक्रियेत सुलभता आणि लहान विक्री केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र धोरण निश्चित करावे, अशी मागणी आमदार निकम यांनी केली.

या मागणीमुळे कोकणातील फळ वाईन उद्योगाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button