
कसबातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाबाबत अधिवेशनात घोषणा; महायुती सरकारचे अभिनंदन – आ. शेखर निकम
चिपळूण : चिपळूण–संगमेश्वर मतदारसंघातील कसबा येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाबाबत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्याबद्दल आमदार शेखर निकम यांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितले की, कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा नियोजन आराखडा अंतिम टप्प्यात असून लवकरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या घोषणेमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणवासीयांच्या भावना पूर्ण होण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडल्याची प्रतिक्रिया आ. निकम यांनी व्यक्त केली.
कसबामध्ये जागतिक दर्जाचे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा ध्यास तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला होता. सुमारे ३१२ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून मध्यंतरी अजितदादा पवार यांनी कसबा येथे भेट देऊन स्मारक स्थळाची पाहणीही केली होती.
शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात केलेल्या घोषणेमुळे अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आ. शेखर निकम यांनी नमूद केले.
या घोषणेबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत तसेच माजी आमदार प्रमोद जठार यांचे आभार मानत महायुती सरकारचे अभिनंदन केले.




