
एसटीला २५० कोटींचे उत्पन्न मिळणार अन् २०० कोटींची बचत होणार, सरनाईक यांनी जाहीर केले उत्पन्न वाढीचे नियोजन!
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) २७१ स्थानकांचा सार्वजनिक – खासगी सहभाग तत्त्वावर विकास केला जाणार आहे. गुजरातच्या धर्तीवर ही बस स्थानके सर्व सोयी – सुविधा युक्त बस पोर्ट म्हणून विकसित केली जाणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली.
विक्रम काळे, सदाभाऊ खोत, भाई जगताप आदींनी या बाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील प्रमुख २७१ बस स्थानकांचा बस पोर्ट म्हणून विकास करण्यात येणार आहे. ही बस स्थानके सर्व सोयी – सुविधायुक्त असतील. गुजरातमध्ये ही संकल्पना राबविण्यात आली होती. या अंतर्गत चांगल्या उत्पन्नक्षम बस स्थानकांसह दोन ग्रामीण किंवा तालुका स्तरावरील बस स्थानकांचा, अशा तीन बस स्थानकांचे एक पॅकेज तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागाचा बस स्थानकांचा समतोल विकास होईल, असेही मंत्री सरनाईक म्हणाले.
राज्यातील बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे विनामूल्य व स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमला जाईल. दोन महिन्यांत या योजनेची अंमलबजावणी होईल. प्रवाशांकडून कोणताही शुल्क आकारला जाणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर ठाणे येथील खोपट आणि मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल येथे चालक – वाहक विश्रांतीगृहांचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये वातानुकूलित व्यवस्था, बंक बेड, स्वच्छ पिण्याचे पाणी, गरम पाण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
२५० कोटींचे उत्पन्न, २०० कोटींची बचत
महामंडळाला पूर्वी जाहिरात व इतर स्त्रोतांमधून वर्षाला सुमारे २२ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. मात्र नव्या निविदा प्रक्रियेनंतर पुढील पाच वर्षांत सुमारे जाहिरातींद्वारे २५० कोटी रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. तर मंडळाला दरवर्षी ३,३०० कोटी रुपयांचे डिझेल लागते. तेल कंपन्यांकडून त्यावर अल्प सूट मिळत होती. मात्र, तेल पुरवठ्याची निविदा काढल्यानंतर कंपन्यांकडून पाच रुपये ते साडेपाच रुपयांपर्यंत प्रती लिटर सूट मिळणार आहे. त्यामुळे मंडळाच्या २०० कोटी रुपयांची बचत होईल, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.




