इराण–इस्रायल संघर्षाचा भारतावर परिणाम; व्यावसायिक LPG पुरवठा तात्पुरता बंद, हॉटेल उद्योग अडचणीत

मुंबई: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण–इस्रायल संघर्षाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. या संघर्षाचा थेट परिणाम एलपीजी (LPG) गॅस पुरवठ्यावर होताना दिसत असून केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत केलेल्या नाकेबंदीमुळे मध्यपूर्वेतून येणाऱ्या एलपीजी टँकरच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भारतातील एलपीजीचा मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून असल्याने या परिस्थितीचा थेट परिणाम देशातील गॅस पुरवठ्यावर होत आहे. नागरिकांना घरगुती गॅसचा तुटवडा भासू नये, यासाठीच केंद्र सरकारने कमर्शियल एलपीजीचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी

या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर होत आहे. नागपूर रेसिडेंट हॉटेल असोसिएशनने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. युद्धाच्या कठीण परिस्थितीत आम्ही केंद्र सरकारसोबत आहोत, मात्र एलपीजीवरील निर्बंध सरसकट न लावता टप्प्याटप्प्याने लागू करावेत, अशी संघटनेची भूमिका आहे.

हॉटेल इंडस्ट्री बंद होण्याची भीती

नागपूर रेसिडेंट हॉटेल असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सुदर्शन वझलवार यांनी सांगितले की, कमर्शियल गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद राहिला तर पुढील चार ते पाच दिवसांत देशातील हॉटेल इंडस्ट्री बंद करण्याची वेळ येऊ शकते. हजारो छोटे-मोठे हॉटेल व्यवसाय या गॅसवर अवलंबून असल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते, अशीही त्यांनी भीती व्यक्त केली.

पुण्यातही व्यावसायिक LPG पुरवठा बंद

दरम्यान, पुण्यातही व्यावसायिक वापरासाठीचा एलपीजी गॅस पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बीपीसीएलच्या शिक्रापूर प्लांटमध्ये तसेच एचपीसीएलच्या चाकण येथील प्लांटमध्ये कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. डीलर्सना पुढील आदेश मिळेपर्यंत कमर्शियल सिलेंडर घेण्यासाठी गाड्या पाठवू नयेत, अशा सूचना तेल कंपन्यांकडून देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button