अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय


भोंदूबाबा आणि कॅप्टन अशोक खरातला बलात्काराच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. पण, या नराधम आणि विकृत अशोक खरात सोबत राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे पोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.एवढंच नाहीतर रुपाली चाकणकर यांनी या बलात्कारी बाबाचे पाय सुद्धा धुतल्याचे व्हिडीओ समोर आले होते. विरोधकांनी या प्रकरणी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. अखेरीस रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर पुरत्या अडचणीत सापडल्या होत्या. दररोज नव नवीन व्हिडीओ आणि फोटो समोर येत होते. एवढंच नाहीतर राष्ट्रवादीतूनही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी तर उघडपणे चाकणकरांवर टीकेची संधी सोडली नाही. त्यामुळे संध्याकाळी राजकीय घडामोडींना वेग आला. चाकणकरांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली.

या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तातडीने राजीनामा देण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्यात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.

यावेळी सुनेत्रा पवार आणि चाकणकर यांच्यामध्ये जवळपास २० ते २५ मिनिटं चर्चा झाली. या भेटीमध्ये चाकणकर यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकर यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्देशून लिहिला आहे.

चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

प्रति,
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य

विषय: अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्विकारणेबाबत

माननीय महोदय,

मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेनं सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.

आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतश: ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.

तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.

धन्यवाद…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button