
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
रत्नागिरी : शहरातील राजिवडा परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींची रवानगी कोठडीत केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली होती. राजिवडा येथील जुबेर सलीम शेख (वय २२) आणि मुस्तकीन गडकरी (वय २४) या दोघांनी एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार केले. पीडित बालक घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याने सुरुवातीला या प्रकाराची कल्पना आपल्या पालकांना दिली नव्हती. मात्र, नराधम आरोपींनी या कृत्याचा व्हिडीओ बनवून तो समाज माध्यमावर व्हायरल केला होता.
१२ मार्च रोजी पीडित मुलाच्या वडिलांना समाज माध्यमावर एक व्हिडीओ निदर्शनास आला. तो पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला, कारण व्हिडीओतील बालक त्यांचा स्वतःचा मुलगा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणभरही विलंब न लावता थेट रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद नोंदवली.
पालकांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी जुबेर शेख आणि मुस्तकीन गडकरी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह अत्यंत कडक अशा बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार, अल्पवयीन मुलांवरील अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कडक शिक्षेची तरतूद आहे. तसेच, व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित केल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता, या प्रकरणाचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी आपल्या हाती घेतला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांनी हा व्हिडीओ आणखी कुठे प्रसारित केला आहे का, याचा तांत्रिक तपास पोलीस करत आहेत.




