
अनिरुद्ध निकम सह्याद्री शिक्षण संस्थेचे नवे कार्याध्यक्ष
चिपळूण : शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी अनिरुद्ध शेखर निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
माजी खासदार, शिक्षण महर्षी तथा सहकार महर्षी गोविंदराव निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला असून नर्सरीपासून नर्सिंग, आयटीआय ते अभियांत्रिकी अशा विविध शाखांमध्ये संस्थेने उल्लेखनीय विस्तार साधला आहे.
गोविंदराव निकम आणि अनुराधाताई निकम यांनी संस्थेची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून शेखर निकम यांनी जबाबदारी सांभाळत संस्थेचा विकास पुढे नेला. सध्या ते आमदार म्हणून कार्यरत आहेत.
आता नव्या पिढीकडे नेतृत्वाची धुरा सोपवित अनिरुद्ध निकम यांच्या रूपाने संस्थेला नवे नेतृत्व मिळाले आहे. अनिरुद्ध निकम यांनी कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण ऑस्ट्रेलियातून पूर्ण केले असून ते उच्चशिक्षित आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी नवी जबाबदारी स्वीकारल्याने संस्थेच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या नियुक्तीबद्दल अनिरुद्ध निकम यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.




