१२ वी परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू; रेल्वेतील गर्दीमुळे तोल जाऊन मृत्यू झाल्याचा अंदाज.!

ठाणे : डोंबिवली येथील १२ वीची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान आढळला. रेल्वेगाडीतील गर्दीमुळे तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. याप्रकरणाची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली.

सोहम कठरे (१८) असे मृत मुलाचे नाव असून तो डोंबिवली येथे त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. १२ वीची परीक्षा सुरु झाल्याने तो डोंबिवली येथून कळवा येथे परीक्षा देण्यासाठी निघाला होता.

मंगळवारी सकाळी तो जखमी अवस्थेत कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळांजवळ आढळून आला. घटनेची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोहम याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

परंतु दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हा अपघात रेल्वेतील गर्दीमुळे तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button