होळी सणासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन

रत्नागिरी : आता कोकणात शिमगोत्सवाचे वेध लागले असून, होळीसाठी चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन होळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई, नागपूर, चिपळूण, रत्नागिरीसह विविध ठिकाणांसाठी तब्बल २०९ होळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई-नागपूर-मुंबई, मुंबई- रत्नागिरी-मुंबई, मुंबई-चिपळूण-मुंबई व अन्य महत्त्वाच्या मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत. दरवर्षी होळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवासी आपल्या मूळ गावी परततात. त्यामुळे नियमित गाड्यांवरील ताण वाढतो. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि अतिरिक्त गर्दीचा भार कमी करण्यासाठी या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्यांमध्ये वातानुकुलित (एसी) कोच असलेल्या गाड्या, एसीसह शयनयान (स्लीपर) सुविधा असलेल्या गाड्या व सामान्य द्वितीय श्रेणीचे कोच असलेल्या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय अल्प अंतराच्या प्रवाशांसाठी अनारक्षित विशेष गाड्याही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध उत्पन्न गटातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
होळीच्या काळात सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाची सोय व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. विशेष गाड्यांचे वेळापत्रक आणि आरक्षणाबाबतची माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर व आरक्षण केंद्रांवर लवकरच उपलब्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button