
होळीसाठी तब्बल २०९ होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा मोठा निर्णय घेतला असून, मुंबई, नागपूर, चिपळूण, रत्नागिरीसह देशातील विविध ठिकाणांसाठी तब्बल २०९ होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
कुटुंबीय, नातेवाईक आणि प्रियजनांसोबत रंगांची उधळण करत होळी साजरी करता यावी, यासाठी हा विशेष रेल्वे ‘बोनान्झा’ असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.भारतीय रेल्वेने यंदाच्या होळी उत्सवासाठी देशभरात एकूण १४१० विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची योजना आखली आहे. त्यामध्ये मध्य रेल्वेचा मोठा वाटा असून, मुंबई– नागपूर–मुंबई, मुंबई– रत्नागिरी–मुंबई, मुंबई– चिपळूण–मुंबई तसेच अन्य महत्त्वाच्या मार्गांवर या विशेष गाड्या धावणार आहेत.
दरवर्षी होळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवासी आपल्या मूळ गावी जातात.
त्यामुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्यांमध्ये वातानुकुलित (एसी) विशेष गाड्या, वातानुकुलित सह शयनयान कोच असलेल्या गाड्या, तसेच सामान्य द्वितीय श्रेणीचे कोच असलेल्या गाड्यांचा समावेश आहे.
याशिवाय, अल्प अंतराच्या प्रवाशांसाठी अनारक्षित विशेष गाड्याही चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध उत्पन्न गटातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.




