
होळीच्या सणासाठी चाकरमानी निघाले कोकणात… काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांना बंदी!, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
.होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणारे चाकरमानी आणि पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. रायगड पोलीसांच्या वाहतूक शाखेने मुंबई गोवा महामार्ग, वडखळ अलिबाग- रेवदंडा मुरूड तसेच खोपोली पाली – निजामपूर माणगाव , कर्जत – खोपोली व इतर मार्गांवर वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे.
ठिकठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
होळी आणि धुलीवंदन सणासाठी मोठया संख्येने चाकरमानी कोकणात आपल्या गावी जात असतात. तसेच सलग सुटया आल्याने पर्यटक देखील मोठया संख्येने कोकणात येण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. चाकरमानी आणि पर्यटकांची वाहतूक कोंडीमुळे गैरसोय होवू नये, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. रायगड पोलीसांच्या जिल्हा वाहतूक शाखेने ४ अधिकारी, ७० वाहतूक पोलीस कर्मचारी, ५० होमगार्ड तसेच स्वयंसेवी संस्थांचे ५० प्रतिनिधी यांची नेमणूक रहदारीच्या मार्गावर करण्यात येणार आहे. याशिवाय स्थानिक पोलीस ठाण्याचे जास्तीत जास्त कर्मचारी वाहतूक नियोजनासाठी तैनात असतील. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर व माणगाव येथे वाहतूक कोंडी मोठया प्रमाणावर होत असल्याने प्रवाशांनी खोपोली – पाली – निजामपूर – माणगाव – महाड या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन रायगड पोलीसांनी केले आहे.
अवजड वाहतूकीला बंदी
अलिबाग-रेवदंडा मार्गावर अवजड वाहतूक बंदीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ तसेच संध्याकाळी ५ ते ७ या वेळात ही अवजड वाहतूक बंद राहणार आहे. यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.




