
हवामान बदलाचा हापूस वर नवे संकट, देवगडमध्ये आंबा मोहोर करपला!
कोकणचा राजा मानल्या जाणाऱ्या हापूस आंब्यावर यावर्षी निसर्गाची वक्रदृष्टी पडली आहे. देवगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोहोर येऊनही बदलत्या हवामानामुळे फळधारणा अत्यंत अल्प झाली असून, आलेला मोहोर करपून काळा पडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त पथकाने तालुक्यातील बागांची ‘क्षेत्रीय पाहणी’ करून बागायतदारांना मार्गदर्शन केले.
तापमान बदल आणि ‘वांझ’ मोहोराचे संकट
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम. भाग्यश्री नाईकनवरे आणि शास्त्रज्ञ डॉ. वैभव शिंदे यांनी मिठबाव, कातवण, कुणकेश्वर आणि इळये येथील बागांची पाहणी केली. जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात तापमानात झालेल्या अचानक घसरणीमुळे परागीभवन प्रक्रियेत अडथळे आले. अनेक ठिकाणी मोहोरात ‘संयुक्त फुलांचे’ प्रमाण कमी असल्याने तो ‘वांझ’ ठरला आहे. ज्या ठिकाणी फळधारणा झाली होती, तिथेही सुपारीच्या आकाराची फळे गळून पडत असल्याने बागायतदार चिंतेत आहेत.
तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजना
बागायतदारांनी खचून न जाता शास्त्रोक्त व्यवस्थापन करावे, असे आवाहन करत पथकाने उपाय सुचवले आहेत. नवीन मोहोर येण्यासाठी झाडावरील जुने, वाळलेले आणि करपलेले मोहोराचे दांडे कापून टाकावेत.मोहोराची गुणवत्ता वाढवण्यासाठी ०:५२:३४ + बोरॉन (२०%) ची फवारणी करावी. फळधारणेनंतर १३:००:४५ आणि प्लॅनोफिक्सचा वापर करावा. झाडाला साधारणतः १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. ओलावा टिकवण्यासाठी झाडाच्या बुंध्याशी गवताचे आच्छादन (Mulching) करावे. हवामानातील बदलाचा ताण कमी करण्यासाठी सायंकाळच्या वेळी बागेत काडीकचरा पेटवून हलके धुरीकरण करावे.
तुडतुडे आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य कीटकनाशक व बुरशीनाशकाची वेळीच फवारणी करावी.
सद्यस्थितीत काही ठिकाणी तिसऱ्या बहराचा मोहोर येत आहे. जर आगामी काळात हवामानाची साथ मिळाली, तरच काही प्रमाणात उत्पादन हाती येईल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.



