
सोनवीच्या मुखाशी मातीचा भराव सुरूच, नागरिकांच्यात तीव्र संताप
संगमेश्वर बाजारपेठेचे नंदनवन मानल्या जाणार्या सोनवी व शास्त्री नद्या सध्या मोठ्या प्रमाणात गाळाने भरल्या असून पावसाळ्यात बाजारपेठेला पुराचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे नदीतील गाळ उपसा करण्याची जोरदार मागणी होत असतानाच मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील माती व दगड थेट सोनवी नदीपात्राच्या मुखाशी टाकले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे..
सध्या सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामादरम्यान माभळे विश्रामगृहासमोर थेट सोनवी नदीपात्रात माती टाकली जात असल्याचे चित्र आहे. यामुळे नदीत पुन्हा गाळ साचत असून, भविष्यातील पुराचा धोका अधिकच वाढत असल्याचा इशारा स्थानिक नागरिक देत आहेत.
विशेष म्हणजे सोनवी पुलाच्या कामादरम्यान यापूर्वीही नदीत मोठ्या प्रमाणावर गाळ साचून संगमेश्वर बाजारपेठेला नुकसान सहन करावे लागले होते. असे असतानाही ठेकेदार कंपनीकडून कोणतीही खबरदारी न घेता पुन्हा नदीत माती व दगड टाकले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या नदीपात्रात गाळ साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडून राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.www.konkantoday.com




