
संगमेश्वरात महामार्गावर नियमबाह्य जीर्ण वाहने धावत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात
संगमेश्वर तालुक्यातून जाणार्या महामार्गावर सुरू असलेल्या रस्ते विकास कामांच्या परिसरात नियमबाह्य, जीर्ण आणि अपूर्ण सुविधांची वाहने खुलेआम धावत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महामार्गाच्या खोदाईमुळे रस्त्याकडेला असलेल्या दुकानांमध्ये जाण्यासाठी मार्गच नसल्याने या दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तर चार ते पाच फूट रस्ता खोदण्याबरोबरच सुरक्षेचे कोणतेही उपाय न केल्याने रहिवाशांसह वाहनचालकांनाही धोका निर्माण झाला आहे. याचबरोबर रस्ता काम करताना बेदरकारपणा, बेबंदशाही आणि दादागिरी सुरू असल्यामुळे सर्वसामान्य संगमेश्वरकर अक्षरशः हतबल आणि हताश झाला आहे.
महामार्गावर धावणार्या अनेक वाहनांना क्रमांक फलकच नसल्याचे दिसून येत आहे. काही वाहनांना फक्त पुढील किंवा फक्त मागील क्रमांक फलक आहे. तर काहींचे क्रमांक इतके अस्पष्ट आहेत की वाचणे अशक्य होते. याशिवाय दिशादर्शक दिवे, परावर्तक पट्टे, मुख्य हेडलाईन नसणे किंवा अत्यंत अंधुक असणे, असे गंभीर दोष अनेक वाहनांमध्ये आढळून येत आहेत. काही वाहने इतक्या मोडक्या अवस्थेत आहेत की, अशी वाहने रस्त्यावर धावणे म्हणजे थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ ठरत आहे.
www.konkantoday.com




