
शेतकऱ्यांच्या संयमाला यश; न्यू मांडवे पाटबंधारे प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील
खेड : न्यू मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी तब्बल तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. १६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ‘वर्षा’ येथे झालेल्या व्यय व अग्रक्रम समिती (इपीसी) बैठकीत या प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे जल फाउंडेशनचे कार्यकर्ते नितीन सखाराम जाधव यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी शासन दरबारी या प्रकल्पाचा विषय लावून धरला होता. २६ जानेवारी रोजी आत्मदहनाचा निर्णय जाहीर केल्यानंतर हा प्रश्न अधिक तीव्रतेने पुढे आला. शासनाच्या मध्यस्थीनंतर आत्मदहन स्थगित करण्यात आले आणि अखेर ठरवलेल्या मुदतीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
न्यू मांडवे प्रकल्पासाठी किंजळे, नातू घोगरे, दहिवली आणि शिंगरी या गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकरी, जागा मालक आणि ग्रामस्थांनी एकजुटीने संघर्ष केला. त्यांच्या संयमामुळे आणि सातत्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे या निर्णयाला गती मिळाल्याचे सांगितले जात आहे.
या मंजुरीमुळे परिसरातील पाणीटंचाईवर मात होऊन शेतीला नवसंजीवनी मिळणार आहे. न्यू मांडवे पाटबंधारे प्रकल्पाची मंजुरी ही केवळ एका प्रकल्पाची पूर्तता नसून, ती शेतकरी एकतेची आणि लोकशक्तीचा मोठा विजय असल्याचे बोलले जात आहे.




