
शिवजयंतीनिमित्त सिंधुदुर्ग किल्ला येथे फिरण्यासाठी आलेल्या रत्नागिरीतील मुलीचा सिंधुदुर्ग किल्ल्यावर मृत्यू
शिवजयंतीनिमित्त सिंधुदुर्ग किल्ला येथे फिरण्यासाठी आलेल्या अस्मी मनोहर गोविलकर (रा. रत्नागिरी टिके-कांबळेवाडी) या दहा वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
रत्नागिरी येथून विद्यार्थी व पालकांचा २५ ते ३० जणांचा समूह गुरूवारी सकाळी मालवणातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. या समुहामध्ये अस्मी गोविलकर ही शाळकरी मुलगी आपल्या आईसमवेत सहभागी झाली होती. किल्ल्यावर भर उन्हात फिरत असताना चक्कर येवून ती जमिनीवर कोसळली. तिच्यासमवेत आलेल्या पालकांनी तिला तत्काळ होडीने मालवण येथे आणले. आणि ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार करण्यापूर्वीच तिचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. अस्मीच्या अकाली निधनामुळे तिची आई मोहिनी गोविलकर यांना मोठा धक्का बसला. अस्मिला लहानपणापासून हृदयाचा आजार असल्याची माहिती तिच्या आईने वैद्यकीय अधिकार्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच मालवणच्या पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा खोत व पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन रेवंडकर यांनी रूग्णालयात धाव घेत पुढील कार्यवाही केली. या घटनेची नोंद मालवण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अस्मीच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
www.konkantoday.com




