“वटवृक्षाची छाया म्हणजे आमचे अण्णा” !

आज केवळ माझे वडील नव्हे तर अनेकांचे पितृतुल्य असलेल्या आदरणीय अण्णांचा वाढदिवस ! त्यानिमित्ताने थोड्या आठवणींना उजाळा देण्याचा छोटासा प्रयत्न करतोय.

आमचे कुटुंब पाली येथे स्थायिक झाले. आम्हा दोन भावंडासह कुटुंबाची जबाबदारी घेऊन अण्णा व्यवसाय करू लागले. व्यवसाय करताना अण्णांनी सचोटी सोबत माणुसकी जपली. त्या माणुसकीचा प्रत्यय आज आम्हा दोन्ही भावांना समाजकारणामध्ये काम करताना पदोपदी येतो. अण्णांनी सचोटीने व्यवसाय करत कुटुंब सांभाळून आम्हा भावंडांना मोठे केले. आज आम्ही दोघे भाऊ समाजकारणात यशस्वी होताना मागे वळून बघतो तेव्हा आम्हाला आमच्या मागे अण्णांचे अपार कष्ट दिसतात. केवळ अण्णांमुळेच आम्ही व्यवसाय सांभाळत समाजकारण करू शकलो. समाजकारण करताना आम्हाला सतत अनेक प्रकारची लोक भेटत असतात. त्यावेळी आम्ही सर्वांना समान न्याय देण्याची अण्णांची शिकवण लक्षात ठेऊन तसे पूर्ण प्रयत्न करत असतो.
आज राज्यभर फिरताना मला अनेक ज्येष्ठ मंडळी भेटतात. त्यांच्या समोर वागताना अण्णांनी दिलेली नम्रतापूर्वक वागण्याची शिकवण लक्षात ठेऊन मी वागण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी ही ज्येष्ठ मंडळी देखील आवर्जून अण्णांचा उल्लेख करत असतात. आमच्या राजकीय जीवनामध्ये देखील अण्णांचा नेहमीच भक्कम पाठिंबा असतो. म्हणूनच आज मी राज्यभर फिरत असलो तरी माझ्या पाली निवासस्थानी अण्णांकडे मात्र कार्यकर्ते सतत जमलेले असतात.
एक आठवण आवर्जून नमूद करावीशी वाटते की, माझ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माझ्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर रत्नागिती मध्ये उपस्थित होते. त्या व्यासपीठावर अण्णा देखील उपस्थित होते. त्या कार्यक्रमामध्ये नानांनी आपल्या शैलीत मनोगत व्यक्त करायला सुरुवात करतानाच अण्णांकडे पाहिले आणि माईक समोरच विचारले की, बाबा कसं वाटतंय आपल्या कर्तृत्ववान मुलाचा कार्य अहवाल प्रकाशित करताना ? त्यावेळी मला अण्णांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
अण्णांनी आम्हा दोन भावंडांसह आमच्या अनेक कार्यकर्त्यांना मुलासमान प्रेम दिले आहे. माझ्यासह आम्हा सर्व कार्यकर्त्यांना अण्णा म्हणजे वटवृक्षाची जणू छाया आहेत.
आजपर्यंत अण्णांकडून मिळालेले प्रेम आणि मार्गदर्शन आम्हा कार्यकर्त्यांना असेच पुढे अनेक दशके मिळत राहो आणि अण्णांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो, हिच माझी त्यांच्या वाढदिवशी देवाचरणी प्रार्थना !

उदय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button