
लोवले येथे कोरड्या विहिरीत पडलेल्या पाच गव्यांची वनविभागाकडून सुटका
संगमेश्वर : तालुक्यातील लोवले येथे सुमारे २० फूट कोरड्या विहिरीत पडलेल्या पाच गव्यांची सुखरूप सुटका करण्यात वन विभागाला यश आले आहे. जेसीबीच्या सहाय्याने विहिरीच्या वाट (रॅम) तयार करून विहिरीत अडकलेल्या रानगव्यांना रस्ता करून देण्यात आला.
याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोवले येथे काल (११ फेब्रुवारी) रात्री ११.३० वाजता संतोष प्रदीप खेडेकर यांच्या १५ ते २० फूट खोल कोरड्या विहिरीत पाच गवे पडल्याची माहिती कृषी सहाय्यक समीर दोरखडे यांनी वनविभागाला दिली. त्यानुसार परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरूख आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून आवश्यक साहित्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. विहिरीत दोन मोठे पूर्ण वाढ झालेले आणि तीन छोटे रानगवे असे मिळून पाच रानगवे पडल्याचे आढळले. विहिरीची उंची जास्त असल्याने त्यांना बाहेर पडण्यास अडचण निर्माण झाली. परिस्थिती लक्षात घेऊन पडीक विहिरीला एका बाजूने जेसीबीच्या सहाय्याने वाट (रॅम) तयार करून विहिरीत अडकलेल्या रानगव्यांना रस्ता करून देण्यात आला. तयार केलेल्या रस्त्यावरून एकूण पाच रानगवे सुरक्षितरित्या रात्री १.३० च्या सुमारास बाहेर काढण्यात आले. रानगव्यांना कोणतीही इजा अथवा दुखापत झालेली नसून, ते जंगलाच्या दिशेने सुरक्षित निघून गेले. या रानगव्यांमध्ये एक मोठा नर व मादी तसेच त्यांची तीन पिल्ले असल्याचे दिसून आले.
हे रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड, परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संगमेश्वर देवरुख सागर गोसावी, वनरक्षक फुणगूस आकाश कडुकर, वनरक्षक आरवली सूरज तेली व वनरक्षक साखरपा सहयोग कराडे यांनी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचेही याकामी सहकार्य लाभले.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागातर्फे विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरीजा देसाई यांनी केले आहे.




