
लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीची केंद्रीय मंडळाकडून पाहणी; महिनाभरात पथक भेट देणार – सिद्धेश कदम
लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीकडे केंद्र सरकारच्या सर्व आवश्यक परवानग्या उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत, तरीही कंपनीची स्वतंत्र पाहणी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दापोली येथे दिली. या मागणीनुसार महिनाभरात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक कंपनीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र कंपनीकडे सर्व वैधानिक परवानग्या असल्याने सध्याच्या घडीला कंपनीच्या कामकाजात कोणतीही कायदेशीर अडचण नाही, असे कदम यांनी स्पष्ट केले. “कंपनीकडून कोणतेही प्रदूषण झाल्यास ते सहन केले जाणार नाही; मात्र सध्या कोणतेही प्रदूषण आढळलेले नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, लोटे औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणाबाबतही गंभीर दखल घेण्यात आली असून, उद्योजकांची विशेष बैठक घेऊन प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी बोलताना सिद्धेश कदम म्हणाले की, “आमच्या सर्व यंत्रणा जागतिक दर्जाच्या आहेत. इटलीत घडलेली घटना ही जाणीवपूर्वक झाली असून तिची पार्श्वभूमी वेगळी आहे.”




